
निम्मित आहे कोल्हापुरातील गोकुळ दूधसंघाच्या निवडणूक निकालाचा विषय जरी पूर्णपणे राजकीय असलातरी या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पूर्णपणे हतबल व निराशेच्या गर्देत लोटलेल्या सर्वसामान्यांच्या भावनेला, आशेला एक वेगळीच झळाळी मिळाली, सर्व काही संपलंय असं वाटत असताना नवी उमेद जागृत झाली. या घटनेचं महत्त्व कोल्हापूर जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, भारतातील लोकशाही हीच आपली यशोदा माता आहे गोकुळात तिच्यापोटी ह्या निकालाच्या रूपानं साक्षात भगवंत अवतरल्याने संपूर्ण ब्रजभूमी उजळून निघाल्यासारखं वातावरण आहे. गोकुळ दूध संघाचा विजय हा प्रथम लोकशाहीचा विजय आहे, पुरोगामीत्वाचा आहे त्यामुळे राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध नसतानाही सर्वसामान्यांना आनंदाचं भरतं आल्यासारखं वातावरण राज्यात आहे.
गोकुळ दूध संघ म्हणजे कोल्हापूरची अस्मिता, दूध संघावर संचालक म्हणून जाणं म्हणजे आमदारकी मिळवल्याची भावना असल्याचं बोललं जातं,संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर गोकुळ संघाचा प्रभाव आहे त्या अर्थाने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती तब्बल ५५०० कोटींची वार्षिक उलाढाल, गेली कित्येक वर्षे राज्यातल्या प्रमुख महानगरांना दूध व उपपदार्थांचा यशस्वी पुरवठा करणारी , जिल्ह्याची अर्थवाहिनी, लाखोंच्या प्रपंचाशी थेट जोडलेली अग्रगण्य संस्था.निवडणूकीसाठी मतदारांची संख्या ५४१८, झालेलं मतदान ५४१६ फक्त दोन जणांना मतदानात सहभाग नोंदवला नाही इतकी मतदारांमध्ये जागरूकता यावरून या संस्थेचं महत्त्व स्थानिक मतदारांच्या जीवनात किती आहे हे लक्षात येतं.
अफाट, अमर्याद पैसा, बेमुर्वत सत्ता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ३ मंत्री, २ खासदार, १० आमदार असा प्रचंड फौजफाटा असलेली भाजपप्रणित महायुतीची शेतकरी विकास आघाडी विरुद्ध सतेज उर्फ बंटी पाटलांच्या नेतृत्वात लढणारी समविचारी आघाडी असा संघर्ष पाहायला मिळाला. अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या निष्ठावान शिलेदाराने रती - महारतींना धोबीपछाड दिले. १३ विरुद्ध १२ अशी समविचारी आघाडीची सरशी झाली. राणाभीमदेवी थाटात निकाल सांगतो ऐका म्हणणारे तोंडावर पडले, भंडारा उचलून मतदारांना शपथा देवून, प्रसार माध्यमांसमोर महायुतीकडून देवी - देवतांच्या आणाभाका झाल्या इतकी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. एकाअर्थाने हे निवडणूक राज्यातील राजकारणात मैलाचा दगड ठरली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या निकालाच्या माध्यमातून सत्तेचा अहंकार सर्वसामान्य जनतेनं मातीत गाडला काहीही करून आपण निवडणूक जिंकू शकतो या महायुतीच्या धोरणाला मतदारांनी तिलांजली दिली आणि हीच राज्यातल्या आगामी बदलाची नांदी आहे म्हणूनच गोकुळ दूधसंघाचा विजय सगळ्यांना जिव्हाळ्याचा वाटतो.
श्री सतेज उर्फ बंटी पाटलांनी दिलेली एकाकी झुंज दैदीप्यमान ठरली अर्थात या यशाची नोंद केवळ महाराष्ट्रापुरती नव्हे तर देश पातळीवर घेतली गेली. अपार मेहनत, नियोजन आणि संयमाचा हा एकहाती विजय आहे. कोल्हापूरची अस्मिता गुजरातच्या दावणीला बांधली जाणार नाही याचा त्यांनी पुरेपूर बंदोबस्त केला, गुजरात मिल्क फेडरेशनकरवी अमोल दूधसमूहाच्या माध्यमातून गोकुळ घशात घालण्याचा डाव श्री सतेज पाटलांनी हाणून पाडला या माध्यमातून त्यांना अस्सल कोल्हापूरी ब्रँड वाचवण्यात यश आलं.हा विजय आहे बंटी पाटलांच्या लढाऊ बाण्याचा, विजीगुषी वृत्तीचा , सत्तेचा अहंकार मोडून काढणाऱ्या संघर्षाचा, हा जल्लोष आहे लोकशाहीचा.
ह्या निवडणूकीच्या निकालाचं लोन राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारं असेल, याला राज्यात येणाऱ्या आगामी बदलाची किनार आहे, आता इथून पुढचा जागर असणार आहे, " वारं फिरलयां महाशक्तीला घेरलयां "
✍️ कल्याण पिसाळ देशमुख. ओझर्डे.
फोन - ९८५०४१२९०९.

Leave a Reply